पुणे : पुणे-सातारा महामार्ग अवैध गुटख्याच्या तस्करीसाठी ‘महाप्रवेशद्वार’ ठरत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. महामार्गालगत शिवरे (ता. भोर) येथील हॉटेल राजस्थानी ढाबा परिसरात राजगड पोलिसांनी धडक कारवाई करून गुटख्याने खचाखच भरलेला ट्रक पकडला. या ट्रकमधून तब्बल ५१ लाखांचा अवैध गुटखा, तसेच ट्रकसह एकूण ६१ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक अश्वनीकुमार त्रिपाठी (रा. मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या घटनेची ताजी जखम
महामार्गावरून अवैध गुटखा वाहतुकीचे हे प्रकरण नवे नाही. काही महिन्यांपूर्वी पकडण्यात आलेला गुटख्याचा ट्रक थेट पोलिस संरक्षणात हलवल्याचे दृश्य माध्यमांतून समोर आले होते. हा पोलीस कर्मचारी कोण?मात्र, त्यावर कोणतीही ठोस चौकशी न करता प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात आले. आता पुन्हा एकदा ट्रक जप्त झाल्याने पोलीस यंत्रणेच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या काळ्या धंद्याचा ‘बोलवता धनी’ कोण आणि या अवैध व्यापाराला पाठबळ कोणाचे, हा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे. सूत्रांनुसार, या प्रकरणाच्या निष्क्रियतेबाबत तक्रारदार मंत्रालय गाठण्याच्या तयारीत आहेत.
गोपनीय माहितीवरून जाळ्यात ट्रक
राजगड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. महामार्गालगत उभ्या असलेल्या एमएच ०४ जेयू ११३९ या ट्रकमधून उग्र वास आल्याने संशय घेण्यात आला. चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ट्रक पंचांच्या उपस्थितीत उघडण्यात आला. तपासात रजनीगंधा पान मसाला, तुलसीसह लाखो रुपयांचा अवैध गुटखा उघडकीस आला.
पोलिस पथकाचा सहभाग
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, महिला पोलिस कर्मचारी प्रमिला निकम, अंमलदार अक्षय नलावडे, मंगेश कुंभार, अजय चांदा यांच्यासह भोर-सासवड उपविभागीय पोलीस कार्यालयातील उपनिरीक्षक उमेश चिकणे, नाईक दत्तात्रय खेगरे आणि शिपाई योगेश राजीवडे यांनी सहभाग घेतला.
प्रशासनावर वाढलेले प्रश्नचिन्ह
गुटख्याचा पुरवठा थेट महामार्गावरून इतक्या मोठ्या प्रमाणात होत असताना यंत्रणा नेमकी कुठे अडकली आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वीचा प्रकार आणि आताची कारवाई यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सर्रास चर्चा सुरू आहे. अवैध गुटख्याच्या प्रवाहाला थांबवण्यासाठी जबाबदार विभाग खरोखर काम करतोय की या रॅकेटला अप्रत्यक्ष संरक्षण देतोय, याचा हिशेब आता नागरिक मागू लागले आहेत.

✍🏻मुख्य संपादक – हनुमंत सुरवसे