महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. अजित पवार हे आज पुण्यातील उरळी कांचनमध्ये एका इमारतीचं उद्घाटन करणार होते. या कार्यक्रमाला शरद पवार देखील उपस्थित राहणार होते. पवार काका पुतणे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. या कार्यक्रमात दोन्ही नेते काय बोलणार? याकडे देखील सगळ्यांचं लक्ष होतं.
मात्र अजित पवार यांनी पुण्यातील सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत. ते तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. मुंबईत एक महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. याच बैठकीला हजर राहण्यासाठी अजित पवार मुंबईला येत असल्याची माहिती आहे. पण मुंबईतील बैठकीचं कारण समोर आलं असलं तरी अजित पवार यांनी शरद पवारांना टाळल्याची देखील चर्चा आहे. असं अचानक अजित पवार मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
खरं तर, मागील तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती सातत्याने ढासळताना दिसत आहे. काही वेळापूर्वी डॉक्टरांचं पथक जरांगे यांची तपासणी करायला आंदोलन स्थळी आलं होतं. त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्याच्या अनुषंगाने महायुती सरकारने ही बैठक बोलवली असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – हनुमंत सुरवसे